जळकोट तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागात कृषि महाविद्यालय लातूरच्या शास्त्रज्ञांची भेट
लातूर, ८ ऑक्टोबर २०२५ – लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील काही भागात अलीकडेच झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर कृषि महाविद्यालय, लातूर येथील विविध विभागांतील तज्ज्ञ शास्त्रज्ञांचे एक पथक नुकतेच या भागाच्या पाहणीसाठी रवाना झाले.
या पथकात मृद व जलसंधारण, कीड व रोग व्यवस्थापन, पिक व्यवस्थापन, फळबाग आणि भाजीपाला व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश होता. पथकाचे नेतृत्व डॉ. व्यंकट जगताप (प्रा. उद्यानविद्या विभाग) यांनी केले. डॉ. विजय भामरे (प्रा. कीटकशास्त्र विभाग) आणि डॉ. वसंत सूर्यवंशी (कृषी विस्तार विभाग) यांनी या दौऱ्यात सक्रिय सहभाग घेतला.
शास्त्रज्ञांनी थेट शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली आणि योग्य उपाययोजना सुचवल्या.
डॉ. वसंत सूर्यवंशी यांनी जमिनीचा पोत खराब होण्याची शक्यता लक्षात घेऊन सोयाबीन, तूर व कपाशी पिकांच्या व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले. तसेच. डॉ.व्यंकट जगताप यांनी फळबाग व भाजीपाला पिकांसाठी तात्काळ निचरा व्यवस्थापन, रोगप्रतिबंधक फवारणी आणि मृदसंवर्धनाचे उपाय सांगितले.
डॉ. विजय भामरे यांनी कीड व रोग व्यवस्थापनाच्या दृष्टीने शेतकऱ्यांना महत्वाचे मार्गदर्शन केले.
शास्त्रज्ञांनी पुढील हंगामासाठी योग्य पीक निवड, आंतरपीक पद्धती, तसेच जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी उपाय यावर भर दिला. तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदोपत्री प्रक्रिया याची माहितीही दिली.
या भेटीचा उद्देश शेतकऱ्यांना शास्त्रीय दृष्टिकोनातून मार्गदर्शन करून मानसिक व आर्थिक आधार देणे हा होता. या उपक्रमाचे परिसरातील शेतकऱ्यांनी स्वागत केले असून, अशा भेटींमुळे त्यांच्या आत्मविश्वासात वाढ होत आहे, असेही त्यांनी नमूद केले.
Comments
Post a Comment