कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या वतीने जाम शिवारात ड्रोनद्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक:
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय परभणी यांचे वतीने माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या अभियानांतर्गत आज दिनांक 13 डिसेंबर 2024 रोजी जाम शिवारात ड्रोनद्वारे कीटकनाशक फवारणीचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमास कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. राहुल रामटेके, कृषी यंत्रे व शक्ती विभागाचे प्रमुख डॉ. गोपाळ शिंदे, मृद व जलसंधारण विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. मधुकर मोरे, तसेच कृषी यंत्रे व शक्ती या विभागाचे सहाय्यक प्राध्यापक (कंत्राटी) डॉ. ओंकार गुप्ता हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस जाम गावकऱ्यांच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब रेंगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी डॉ. गोपाळ शिंदे यांनी डिजिटल तंत्रज्ञानाचा कृषी क्षेत्रात वापर तसेच ड्रोन आणि रोबोट तंत्रज्ञानाविषयी तांत्रिक मार्गदर्शन शेतकरी बांधवांना केले. डॉ. मधुकर मोरे यांनी मृद व जलसंवर्धन आणि उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर याविषयी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. राहुल रामटेके यांनी शेती क्षेत्रात कृषी अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा अवलंब मोठ्या प्रमाणावर होत असून या शाखेतील सिंचन अभियांत्रिकी, मृद व जलसंधारण, कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी, कृषी यंत्रे व शक्ती अभियांत्रिकी, अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत या विषयातील तंत्रज्ञानाचा अवलंब शेतकऱ्यांनी आत्मसात करावा असे आवाहन केले. कार्यक्रमास जाम महापुरी तसेच आळंद येथील सुमारे 200 शेतकरी उपस्थित होते. यावेळी विद्यापीठाच्या वतीने कापूस तसेच संत्रा प्रक्षेत्रावर कीटकनाशक फवारणीचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. सदर प्रात्यक्षिक यशस्वी करण्यासाठी विशाल काळबांडे, श्रद्धा मुळे आणि ड्रोन पायलट प्रशिक्षणार्थी यांनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment